वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत सुमारे 12 तास चर्चा झाली. वक्फ सुधारणा विधेयक अन्याय करणारे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर केंद्रीय गृहमंत्री यांनी राज्यसभेत आक्रमक भाषण केलं. त्यानंतर मध्यरात्री मतदान घेण्यात आलं आणि मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ विधेयक मंजूर झाल्याचं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले. राज्यसभेतील 128 खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर 95 खासदारांनी विरोधात मत दिले. लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैहजर होते, अशी माहिती समोर आली आहे.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतले दोन खासदार आणि राज्यसभेत स्वतः शरद पवार अनुपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार चर्चेला अनुपस्थित राहिले. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभागृहात अनुपस्थितीत होती. तसंच वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भात जेपीसीच्या काही बैठकांनाही बाळ्यामामा अनुपस्थित राहिले अशी माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांची वैचारिक अडचण झालीय. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत उपस्थित राहून विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे आता पक्षातील मुस्लिम नेत्यांची अडचण झालीय. समाजात शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा घेऊन पुढे जाणारा पक्ष असा प्रचार राष्ट्रवादीतर्फे नेहमीच केला जातो. मात्र आता विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने यावर आता अल्पसंख्य समाजाला काय उत्तर द्यावं असा प्रश्न निर्माण झालाय. पक्षातील अल्पसंख्यांक विभाग तसंच पक्षातील इतर मुस्लीम नेते एकत्र येऊन लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैहजर; पक्षाचे लोकसभेतील ते दोन खासदारही अनुपस्थितीत
- Advertisement -


