Thursday, February 19, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम

जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीवर नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्रामविकास विभागाने प्रशासक नियुक्तीचे निर्देश दिल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. परंतु ग्रामविकास विभागाने मंगळवारी ग्रामपंचायत शाखेला मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीची तात्काळ प्रभाग रचना करण्याचा आदेश दिले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे.

नगरपालिका, महानगरपालिका पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने जानेवारी-डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीवर टप्प्याटप्प्याने प्रशासक नियुक्त होणार आहेत. यामुळे किमान सहा महिने ते वर्षभर निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रशासक नियुक्तीला सरपंच परिषदेसह नागरिकांमधून विरोध होऊ लागला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तारीख निश्चित नसली तरी ग्रामविकास विभागाने मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करण्याची सूचना ग्रामपंचयात शाखेला दिली आहे.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत आहे, त्यापूर्वी सहा महिने संबंधित संस्थेच्या हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही. त्यामुळे मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतीची तात्काळ प्रभाग रचना करण्याची सूचना देण्यात आली आहे. यानुसार तहसीलदारांनी गावाचा नकाशे करावा, तलाठी व ग्रामसेवक यांना संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग, सीमा निश्चित करावी तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार 20 फेब्रुवारी ते 23 एप्रिल दरम्यान नकाशे तयार करणे, प्रारुप प्रभाग रचना प्रस्ताव करणे, जिल्हाधिकारी यांची मान्यता घेणे, आवश्यक दुरुस्त्या करणे, निवडणूक आयोगाला प्रारुप आराखडा सादर करणे, आयोगाच्या सूचनांची दुरुस्ती करणे, प्रारुप रचनेची प्रसिद्धी करुन हरकरती, सूचना मागवणे, उपविभागीय अधिकारी यांच्यापुढे सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांना अभिप्राय सादर करणे आदी प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रारूप प्रभाग रचना टप्पा

– तहसीलदारांनी गुगूलअर्थनुसार प्रत्येक गावाचे नकाशे तयार करावे – 20 फेब्रुवारी
– संबंधीत तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त पाहणी कार्यक्रम व प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे – 27 फेब्रुवारी
– तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभागरचनाची तपासणी करणे – 5 मार्च
– सदर समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करणे -11 मार्च
– जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे व आवश्यक त्या दुरूस्त्या करणे – 17 मार्च
– राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यास प्रस्तावात दुरूस्ती करणे -23 मार्च
– या दुरूस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देणे – 30 मार्च

प्रभाग रचनेचा कार्यक्रम
7 एप्रिल – प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध
13 एप्रिल – हरकती घेण्याची अंतिम तारीख
21 एप्रिल – हरकती व सूचनांवर सुनावणी
28 एप्रिल – अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगास सादर
4 मे – अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार

तालुका ग्रामपंचायत
अकोले – 52
संगमनेर – 94
कोपरगाव – 29
राहाता – 25
श्रीरामपूर – 27
राहुरी – 44
नगर – 59
पाथर्डी – 78
शेवगाव -48
कर्जत – 56
जामखेड – 47
पारनेर – 88

श्रीगोंदा – 59

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles