अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालय व उपकार्यालयांना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या गड-किल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापौर ज्योतीताई गाडे यांच्याकडे महासभेत निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महानगरपालिकेचा कारभार हा प्रमुख चार प्रभाग समिती कार्यालये व विविध उपकार्यालयांच्या माध्यमातून चालवला जातो. या कार्यालयांना ऐतिहासिक गड-किल्ल्यांची नावे दिल्यास शहराची ओळख अधिक समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण होईल.
महाराष्ट्राच्या इतिहासातील गड-किल्ले हे केवळ वास्तू नसून ते स्वाभिमान, शौर्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे किल्ले आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात.
प्रभाग कार्यालयांना अशी नावे दिल्यास नागरिकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होईल तसेच नव्या पिढीला आपल्या परंपरेची जाणीव होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी खालीलप्रमाणे गड-किल्ल्यांची नावे सुचवली आहेत : प्रभाग समिती क्र. १ (सावेडी) – रायगड, प्रभाग समिती क्र. २ (जुनी मनपा कार्यालय) – शिवनेरी, प्रभाग समिती क्र. ३ (झेंडीगेट कार्यालय) – प्रतापगड, प्रभाग समिती क्र. ४ (बुरुडगाव कार्यालय) – सिंहगड, केडगाव उपकार्यालय – राजगड, नागापूर उपकार्यालय – तोरणागड
महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालय व उपकार्यालयांना वरीलप्रमाणे गड-किल्ल्यांची नावे देण्याबाबत संबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात यावेत, अशी मागणी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, माजी सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक करण कराळे, रेवनाथ पवार, नगरसेविका वंदना ताठे आदी उपस्थित होते.
मनपाच्या प्रभाग कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे द्या; माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची मागणी
- Advertisement -


