Tuesday, October 28, 2025

विजेच्या लपंडावामुळे केडगावमध्ये पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर ; सणासुदीच्या काळात नागरिक त्रस्त

विजेच्या लपंडावामुळे केडगावमध्ये पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर ; सणासुदीच्या काळात नागरिक त्रस्त

माजी सभापती मनोज कोतकर यांचे महावितरण कार्यालयाला निवेदन

अहिल्यानगर : ऐन सणासुदीच्या काळात केडगाव उपनगरात विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीसारख्या प्रकाशोत्सवाच्या काळात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी महावितरण कार्यालयावर जोरदार टीका केली असून, तातडीने पाणीपुरवठा आणि विजेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
महावितरण कार्यालयाकडून नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मुळा धरण, विळद व नागपूर येथील महापालिकेच्या वितरण व्यवस्थेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने केडगाव उपनगराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. विशेषतः पाच मिनिटे जरी लाईट गेली तरी पाणीपुरवठा दोन ते चार दिवस पुढे ढकलला जातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे केडगावसारख्या विस्तीर्ण आणि लोकवस्ती असलेल्या उपनगरात बाजारपेठेतील व्यापारी, सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात पाण्याची कमतरता असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
माजी सभापती मनोज कोतकर यांनी शहर उपअभियंता चव्हाण यांना निवेदन देत या विषयावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन करण्याची पद्धत योग्य नाही. सणासुदीच्या काळात तरी महावितरणने नागरिकांना दिलासा द्यावा. दिवाळी हा प्रकाशाचा सण असून या काळातच विजेचा पुरवठा खंडित करणे म्हणजे नागरिकांच्या आनंदात व्यत्यय आणणे आहे. दिवाळीच्या काळात पाण्याची मागणी अधिक असते, कारण या काळात कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-परिवार एकत्र येतात. त्यामुळे पाणीपुरवठा अखंडित आणि पूर्ण दाबाने राहणे अत्यंत गरजेचे आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महावितरण कार्यालयाने तातडीने ठोस पावले उचलून हा प्रश्‍न निकाली काढावा. केडगावसारख्या शहराच्या मोठ्या उपनगरात अशी परिस्थिती निर्माण होणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. नागरिकांनीही महावितरण कार्यालयाने जबाबदारी घ्यावी आणि स्थिर वीजपुरवठा राखावा, अशी मागणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles