लग्न म्हटलं की, थोडी मस्ती, थोडं हसण, मज्जा मस्ती ही असायलाच हवी. विशेषत: मेहुणी आणि भावोजी यांच्यात कुरबुरी होणे ही तर अगदी सर्वसामान्य बाब असते; पण कधी कधी या कुरबुर इतकी वाढते की, अगदी मर्यादा ओलांडली जाते आणि आनंदी वातावरण क्षणातच बिघडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेहुणीने केलेला एक छोटासा विनोद भावोजींना इतका खटकतो की, दोघांमध्ये त्यावरून थेट वाद सुरू होतो. लग्न समारंभात घडलेली ही घटना पाहणाऱ्यांनाही थक्क करून सोडते.
हा व्हिडीओ लग्नाच्या एका विधीचा आहे, जिथे मंडपात सगळे आपापल्या कामात व्यग्र असतात. एका बाजूला हास्याची खसखस पिकत असून, गोंधळही सुरू आहे. दरम्यान, मेहुणी मजेशीर मूडमध्ये भावोजींसोबत काही विनोद करते. हसत हसत ती मिठाई जबरदस्तीने त्यांच्या तोंडात भरवण्याचा प्रयत्न करते. मात्र, हा हलकासा विनोद भावोजींना आवडत नाही. ते लगेच रागावतात आणि मेहुणीवर ओरडतात. पुढच्याच क्षणी दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि वातावरण तणावपूर्ण होते.
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, मेहुणीने केलेल्या खोडीवर भावोजी लगेचच रागावतात. ते तिला रागाने बाजूला ढकलतात आणि दोघांमध्ये थोडी झटापटही होते. त्यामध्ये मेहुणी खाली पडते. त्यानंतर तिथले लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत दोघांना वेगळं करतात. लग्नातील हशा एकदम गायब होतो आणि सगळेच थोडे अवघडलेले दिसतात. काहींना वाटतं की, हे सगळं मजेत केलं गेलं होतं, तर काहींना वाटतं भावोजी खरोखरच रागावले होते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल झाला आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.


