कल्याण रोडवरील सीना नदी पूलाच्या कामाला मिळणार गती!
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली पूलाची पहाणी; प्रशासनाला तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या सूचना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाचे काम गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असून अद्याप अपूर्ण आहे. काम संथ गतीने सुरू असल्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास पुलावरुन पाणी वाहते आणि वाहतूक ठप्प होते. त्यामुळे नागरिकांचा शहराशी संपर्क तुटून दैनंदिन जीवन विस्कळीत होते. या गंभीर समस्येची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः पूलाची पाहणी करून प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.
सीना नदीवरील पूल हा कल्याण रोड परिसरातील नागरिक, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यास या पुलावरून वाहतूक थांबते. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतो. यामुळे महिला, शालेय विद्यार्थी व व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा पुलावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे.
माजी खासदार डॉ. विखे पाटील यांनी जुन्या पुलासह उभारणी सुरू असलेल्या नवीन पुलाची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी नगरसेवक पै. सुभाष लोंढे, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, भाजप नेते दत्ता गाडळकर, युवा सेनेचे महेश लोंढे, अभिजीत बोरुडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, विजय गायकवाड, विशाल खैरे, सुरेश लालबागे, अजय चितळे आदी उपस्थित होते.
खासदार विखे यांनी संबंधित प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, आठ ते दहा दिवसांत पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू केले पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते व ठेकेदारांसोबत तातडीची बैठक घेऊन प्रलंबित तांत्रिक अडचणी सोडवाव्यात. गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून याकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुलाचे रखडलेले काम मार्गी लागण्यासाठी माजी नगरसेवक पै. सुभाष लोंढे, भाजप नेते दत्ता गाडळकर व पै. महेश लोंढे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. खासदार विखे पाटील यांनी पूलाचे काम आता कोणत्याही परिस्थितीत विलंब न लावता पूर्ण केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.
सीना नदीवरील पूल हजारो नागरिकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे या कामाला गती मिळाल्यास वाहतूक कोंडी, अपघात आणि पावसाळ्यातील त्रास यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील उड्डाणपूल कधी पुर्ण होणार; माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी दिली माहिती
- Advertisement -


