भुजबळांचा अभ्यास कच्चा आहे, अंतरवालीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला हे सगळ्यांनाच माहिती आहे असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी दिलं. कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी त्याने लाठीचार्जचं समर्थन करू नये असंही रोहित पवार म्हणाले. आंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेकीवरून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांवर आरोप केला. याबाबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.रोहित पवार म्हणाले की, “कदाचित छगन भुजबळ यांचा अभ्यास जरा कच्चा आहे. छगन भुजबळ यांना आणि सगळ्यांना देखील माहिती आहे की कोणीतरी पोलीस प्रशासनाला आदेश दिला आणि मगच तिथे लाठीचार्ज झाला. तुम्ही एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करता, मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळी गृहमंत्री होते, आणि तिथे असणारा पोलीस हा केवळ गृहमंत्र्यांच्याच आदेश पाळू शकतो हे विसरता. त्यामुळे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये किंवा त्या लाठीचार्जचं समर्थन करू नये.”
अंतरवालीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीमध्ये 83 पोलीस जखमी झाले. या दगडफेकीचे नियोजन आदल्या रात्री झालं होतं. त्या बैठकीला शरद पवार गटाचा आमदार उपस्थित होता असा आरोप छगन भुजबळांनी केला. त्या आमदाराला आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पाडल्याचंही भुजबळ म्हणाले होते.महिला पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतरही शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरे अंतरवालीत मनोज जरांगेच्या भेटीला गेले. त्यामुळे जरांगे मोठा झाला असा दावा छगन भुजबळांनी केला.
छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांच्या कन्या आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. भुजबळांबद्दल आदर आहे, त्यांच्याबद्दल बोलणार नाही असं म्हणत म्हणत हलकेच त्यांच्या जेलवारीची आठवण करुन दिली. छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवर पुरावा काय असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी केला.
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी केलेल्या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. लाठीचार्जच्या आदल्या रात्री दोन वाजता आमदारांनी भेट घेतली. यानंतर महिला पोलिसांवर तुफान दगडफेक झाली. पोलिस घरोघरी लपत होते अशी माहिती बापूसाहेब म्हणून आहेत त्यांनी दिल्याचं भुजबळ म्हणाले. तसंच दगडफेकीमागे पवार आहेत असं वक्तव्य आपण केलं नाही असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं.


