विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने अनेक नवनवीन योजना आणल्या होत्या. यामध्येच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले. महायुतीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात देखील आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आता निवडणूका झाल्या, महायुतीची सत्ता आली. मात्र अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अंशातच आज कोल्हापुरातील चंदगडच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ‘मी आश्वासन दिलं होतं का?’ असे म्हणत कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन हात झटकला आहे.
महायुतीला आणि विशेषत: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या भरघोस यशानंतर आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात अडकूर मध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा भव्य नागरी सत्कार आणि शेतकरी मेळावा पार पडला. याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय विषयांवर भाष्य केले. महायुतीच्या १०० दिवसांचं रिपोर्ट कार्ड महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्याच्या जनतेसमोर मांडण्यात आल आहे. हा कार्यक्रम सुरुवातीला गंभीरतेने घेतलं नाही. पण आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आहे की, चांगलं काम केलं पाहिजे. पीक विम्यात ज्यांनी चुकीचं केलं आहे त्यांच्यासाठी मी चुना लावला, असं मी बोललो होतो. मात्र ते शेतकऱ्याला बोललो नाही. राज्यातील बळीराजाला मी कसं काय बोलू शकतो. मी देखील शेतकरी आहे, काही महाठगांनी चुना लावला म्हणून मी बोललो असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी, अशी मागणी केली जात होती. याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘जनगणनेच्या बाबतीत विरोधक दबाव आणू शकतात का? जातनिहाय जनगणना झाली पाहिजे कुठल्या घटकाची लोकसंख्या किती आहे हे समोर येईल. खोटं नॅरेटिव्ह पसरवण्यात विरोधक आघाडीवर आहेत. काँग्रेसची इतकी वर्षे सत्ता होती मग ती त्यावेळी का केलं नाही, असा सवालही अजित पवार यांनी विरोधकांना विचारला आहे. तर रायगडला जिल्ह्याला पालकमंत्रीपद दिले नाही म्हणून काही अडलं आहे का? असा सवाल उपस्थित करता पवार म्हणाले ‘सर्व काम होत आहेत, कोण काय बोललं याच्याबद्दल मला विचारू नका’


