गेल्या दोन आठवड्यांपासून इंदोरमधील एका दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याची आणि नंतर त्यातील पतीच्या हत्येची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सोनम व पती राजा रघुवंशी हे २२ मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाले. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यामुळे त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पण सोनम रघुवंशी मात्र बेपत्ता होती. अखेर सोनम उत्तर प्रदेशच्या गाझिपूरमध्ये सोनम एका ढाब्यावर विमनस्क अवस्थेत आढळून आली असून तिनंच तिच्या पतीची भाडोत्री हल्लेखोरांकरवी हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं आहे.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी स्वत: यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून मेघालय पोलिसांना मोठं यश मिळाल्याचं म्हटलं आहे. “७ दिवसांच्या आत मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या तपासात मोठं यश मिळवलं आहे. मूळच्या मध्य प्रदेशच्या तीन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिलेनंही पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून आणखी एका हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम चालू आहे”, अशी पोस्ट संगमा यांनी शेअर केली आहे.
सोनमनं स्वत:च फोन करून दिली माहिती!
दरम्यान, यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृ्त्तानुसार, खुद्द सोनमनंच तिच्या कुटुंबीयांना फोन करून आपला ठावठिकाणा सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी इंदोर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. इंदोर पोलिसांनी तातडीने गाझीपूरमधील पोलिसांना याची माहिती दिली. गाझीपूर पोलिसांनी लागलीच मिळालेल्या माहितीनुसार एका ढाब्यावर जाऊन सोनमला अटक केली. इंदोर पोलिसांचं एक पथक सोनमला ताब्यात घेण्यासाठी रवाना झालं आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, सोनमनंच भाडोत्री हल्लेखोरांना पती राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती. हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी या प्रकरणाला मिळालेल्या नाट्यमय वळणामुळे पोलिसदेखील चक्रावून गेले आहेत. राजा रघुवंशीची व सोनम बेपत्ता होण्याआधी त्यांना तीन जणांसमवेत पाहिल्याचं एका स्थानिक गाईडनं सांगितलं होतं. ते हिंदीत बोलत होते असंही त्याने सांगितलं होतं. याच तिघांनी राजा रघुवंशीची हत्या केली असण्याचा संशय पोलिसांना आहे.
२ जून रोजी सापडला राजाचा मृतदेह
शोध पथकांना २ जून रोजी सोनमचा पती २८ वर्षीय राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयमधील एका खोल दरीत सापडला होता. ११ मे रोजी या दोघांचा विवाह झाला होता. २० मे रोजी दोघेही मधुचंद्रासाठी मेघालयला निघाले. आधी गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला ते गेले. तिथून ते शिलाँगला जातो असं कुटुंबीयांना फोनवर सांगून निघाले. पण २३ मे पासून दोघेही बेपत्ता होते राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमचं अपहरण झालं असण्याची शक्यता तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने पोलीस सोनमचा शोध घेत असताना अचानकच या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.