नगर शहरात अलीकडच्या काळात हिंदूंना लक्ष्य करत आव्हान देणार्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, आता या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला. एका समाजातील व्यक्तींनी त्यांच्या सणाच्या वेळेस साहित्य खरेदीसाठी पत्रके वाटली होती. त्यांच्या प्रमुख्यांना याची कल्पना देऊन देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपण देखील आता कृती करण्याची गरज आहे, अशी भूमिका घेत आ. जगताप यांनी दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करा, या आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
दरम्यान यावेळी भाजप आ. गोपिचंद पडळकर यांनी क्रिकेटमध्ये भारत हरल्यावर फटाके वाजविणारे, महापुरूषांचे विटंबना करणे हे मोठे षडयंत्र आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करणे, आजारपणाचा गैरफायदा, मंत्र आदी कारणे पुढे करत अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेतला जातो. अशा प्रवृत्तीला जशाच-तसे उत्तर द्या. काहीजण अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव हे नामांतर मान्य करत नाहीत. मात्र, शाळेचा दाखला, मालमत्ता कागदपत्रे आदी शासकीय ठिकाणी नामांतर झालेल्या नावाचा वापर करावा लागतो. त्यामुळे हे मान्य करा. पुन्हा नामांतरण करण्याच्या भानगडीत पडू नका, असा सज्जड दम काही विशिष्ट समाजाला देण्यात आला.
नगर शहरात मागील आठवड्यात महापुरूषांचा अपमान करणारे पत्रके भिरकवल्याच्या निषेधार्थ शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या वतीने रविवारी (दि. 12) आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरूवात झाली. मोर्चा दिल्लीगेट येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा झाली. यावेळी आ. जगताप बोलत होते. ज्येष्ठ नेते वाल्मिक निकाळजे अध्यक्षस्थानी होते. आ. पडळकर, सागर बेग आदी उपस्थित होते.
आ. जगताप यांनी येणार्या काळात हिंदूंनी संघटित राहून जागृत राहण्याचे आवाहन करून हिंदूंकडूनच खरेदी करण्यात गैर काहीच नाही, असे सांगून याची सुरूवात आधी त्यांनी पत्रके वाटून केली होती. अशा वृत्तीच्या व्यक्तींची विचारसरणी संविधानानुसार नाही. आक्षेपार्ह पत्रक हे अशाच व्यक्तीने टाकले. त्यानंतर शहरातील वातावरण दुषित झाले. पोलिसांनी संशियत आरोपीला अटक केली. हिंदूंच्या सण- उत्सव आल्यावर असे प्रकार घडून आणले जातात. अशा प्रकारातून कोठला भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळेस पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत जमावाची मजल गेली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखविला. अनेक दंगेखोरांना अटक केली.
निवडणुकीच्या वेळेस उमेदवाराचे काम ते पाहत नाहीत. धर्म पाहून मतदान करतात. देशात अनेक ठिकाणी असे उमेदवार विजयी झाले आहेत. मध्यंतर हैद्राबाद आणि छत्रपती संभाजीनगरचे दोघे शहरात येऊन गेले. त्यांनी त्यांची विचारधारा येथे प्रसारीत केली. मात्र, आपण संविधानाला मानतो. महापुरूषांची विटंबना सहन केली जाणार नाही. यापुढे आधी जशाच-तसे उत्तर दिले जाईल, त्यानंतर निषेध मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.


