Monday, February 23, 2026

अजितदादांच्या जाण्याने अहिल्यानगरच्या चौथीतील विराजचे स्वप्न अधुरेच…!

अजितदादांच्या जाण्याने विराजचे स्वप्न अधुरेच…!
      पारनेर : पारनेर तालुक्यातील दुर्गम भागातील धोत्रे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील चौथी वर्गातील विद्यार्थी विराज सुभाष  सासवडे याने मागील वर्षी झालेल्या हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात व्दितीय क्रमांक मिळवून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला होता. या उल्लेखनीय यशाची दखल घेत अजितदादा पवार यांनी विराज व त्याच्या शिक्षकांना भेटीसाठी खास आमंत्रण दिले होते. या भेटीची विराजला मोठी उत्सुकता होती; अजितदादांना प्रत्यक्ष भेटणे हे त्याच्या लहानशा मनातील मोठे स्वप्न होते.
मात्र आज अजितदादांच्या अकाली जाण्याने हे स्वप्न अधुरेच राहिले.
       या वर्षीही विराज सासवडे चा तालुक्यात प्रथम क्रमांक आला.जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आल्यावर शिक्षक व वर्गातील सर्व मित्रांना घेवून मुंबईला दादांकडे जायचे आश्वासन गेल्या पंधरा दिवसांपासून तो सर्वांना देत होता.स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आल्या असतानाच दादांच्या निधनाच्या बातमीने विराजसह शाळेतील छोटया छोट्या मुलांची मनं हळवी झाली.
  आज त्यांच्या जाण्याने मुलांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात एक शांत प्रश्न होता –
“आता आम्हाला स्वप्न दाखवणारे दादा कोण?”
      अजितदादांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि गुणवंतांचे कौतुक करण्याची त्यांची भूमिका विराजसारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान होती. त्यांच्या जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर शिक्षणप्रेमी समाजातही हळहळ व्यक्त होत आहे.
       विराजच्या यशाला अजितदादांनी दिलेले प्रोत्साहन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील,अशी भावना शिक्षक सचिन ठाणगे व नंदा चेमटे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles