राहुरी विद्यापीठ परिसरातील नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका 50 वर्षीय महिलेचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सुभद्रा साहेबराव जगधने (वय 50 वर्षे), रा. लक्ष्मीनगर, राहुरी, ह्या शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नगरहून राहुरीकडे येत असताना राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात सुभद्रा जगधने यांना जबर मार लागल्याने मृत्यू झाला.
काल दि. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजे दरम्यान मयत सुभद्रा जगधने यांच्या मृतदेहावर शहरातील गणपती घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत महिलेचा अंत्यविधी झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व समाजबांधवांनी राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गावरील जिजाऊ चौक येथे काल सायंकाळच्या सुमारास अचानकपणे चक्काजाम आंदोलन करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले.
याप्रसंगी नंदु शिंदे, कांतिलाल जगधने, ज्ञानेश्वर जगधने, सुर्यकांत वाकचौरे, सिंधुबाई जगधने यांनी आपले मनोगत व्यक्त करून संताप व्यक्त केला. तसेच संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. सुमारे अर्धा तास अचानक झालेल्या रास्तारोको आंदोलनामुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माघार घेत रस्ता मोकळा केला.
यावेळी गंगा उंडे, एकनाथ जगधने, भीमराज जगधने, सोन्याबापू जगधने, रवींद्र जगधने, राहुल जगधने, सचिन जगधने, संतोष जगधने, निलेश पाखरे, दत्तात्रय जोगदंड, दीपक बलसने, मुकेश जगधने, वसंत लाहुंडे, जयंत जगधने, निलेश जगधने, आकाश जगधने, आनंद जोगदंड, सचिन जोगदंड, आदित्य जगधने, अमोल जगधने आदिंसह शेकडो नातेवाईक व नागरिक उपस्थित होते.


