अहिल्यानगर -एका महिला डेंटिस्ट डॉक्टरने आपल्या सासरच्या मंडळींविरूध्द वाई (जि. सातारा) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार पती रोहित उमेशचंद्र सुद्रिक, सासू रोहिणी उमेशचंद्र सुद्रिक व सासरे उमेशचंद्र विठ्ठलराव सुद्रिक (सर्व रा. दिल्ली गेट, अहिल्यानगर) यांच्या विरोधात शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देण्याचा तसेच जातिवाचक अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे.दरम्यान, सदरचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने तो तपासकामी तोफखाना पोलिसांकडे वर्ग झाला आहे. फिर्यादी मूळच्या अहिल्यानगर येथील असून सध्या त्या आपल्या माहेरी वाई येथे राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2012 मध्ये प्रेमविवाहानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी न करताच लग्न स्वीकारले होते. मात्र, काही वर्षांतच त्यांच्या सासू-सासर्यांनी व पतीने मिळून त्यांना सतत शिवीगाळ, दमदाटी, जातीवरून टोमणे व शारीरिक त्रास देणे सुरू केले. फिर्यादी यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले आहे की, 2016 मध्ये पती रोहित यांनी क्लिनिकसाठी चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेराहून सव्वा दोन लाख रूपये आणण्यास भाग पाडले.
त्यानंतर 2019 मध्ये अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी 22 लाख रूपयांची मागणी करत ती रक्कमही फिर्यादी यांनी आपल्या आई व भावाकडून उभी करून दिली. पीडितेचा मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पती अमेरिकेत असताना सासू-सासर्यांनी जातीय अपमानास्पद शब्दांत बोलत वारंवार तिचा मानसिक छळ केला, असा आरोपही केला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती रोहित सुद्रिक, सासू रोहिणी सुद्रिक व सासरे उमेशचंद्र सुद्रिक यांच्याविरूध्द छळ, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल झाला असून तो तपासकामी तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.


