पाथर्डी पोलीस ठाण्यात महिलांचा गोंधळ; चार महिलांमध्ये लाथाबुक्क्यांची मारामारी, चारही महिला अटक
पाथर्डी ;
आज दुपारी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्येच चार महिलांमध्ये लाथाबुक्क्यांची मारामारी होऊन वातावरण तंग झाले. उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून भांडण सोडविले. मात्र एकमेकींना धमक्या देत पुन्हा संघर्ष सुरू झाल्याने पोलिसांनी अखेर चौघींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास अर्चना कांदे चव्हाण (४६ रा. साकेगाव, ता. पाथर्डी, जि. अ.नगर) या आपल्या आई लताबाई भोसले ( वय ५०) यांच्यासोबत पाथर्डी बसस्थानकातून अहिल्यानगरकडे निघाल्या होत्या. बस सुरु झाल्यानंतर त्याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या मेघा संजय भोसले (१९, रा. आगासखांड, ता. पाथर्डी) हिच्या पायाने अर्चना यांच्या पिशवीस लागल्याने व बसण्याच्या जागेच्या वादावरून तिघींमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढून थेट लाथाबुक्क्यांच्या हाणामारीत बदलला.एस.टी. बसचालकाने तातडीने बस थेट पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली. तिथे पोहोचल्यावरही महिलांचा राग शमला नाही. दोन्ही बाजू पुन्हा एकमेकींवर तुटून पडल्या. या वेळी महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते, मनिषा धाने, चंद्रावती शिंदे व सुरेखा गायकवाड यांनी मोठ्या प्रयत्नाने भांडण सोडविले.अर्चना चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मेघा भोसले हिने मला आणि माझ्या आईला बसमध्ये मारहाण केली. नंतर पोलीस स्टेशनमध्येही तिच्या मावशी वाळुबाई काळे हिने एकत्र येऊन आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीव घेण्याची धमकी दिली असे म्हटले आहे.
तर दुसऱ्या बाजूला मेघा भोसले हिने सांगितले की, अर्चना चव्हाण व लताबाई भोसले यांनी बसमध्ये वाद घालून मला आणि माझ्या मावशीला शिविगाळ करून मारहाण केली. पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर त्यांनी पुन्हा हाणामारी केली आणि बाहेर आल्यावर जीव घेण्याची धमकी दिली असा तिचा आरोप आहे.या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मेघा भोसले यांच्या तक्रारीवरून अर्चना कांदे चव्हाण आणि लताबाई भोसले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला आहे.
यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अर्चना चव्हाण यांनी पुन्हा एकदा मेघा भोसले व वाळुबाई काळे पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर त्यांना जिवंत सोडणार नाही असे धमकीचे वक्तव्य केल्याचे नोंदविण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी बी.एन.एस कलम १७० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही महिलांना अटक केली आहे.या घटनेमुळे काही वेळ पोलीस ठाण्यात चांगलाच गोंधळ उडाला होता. उपस्थित कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून पुढील तपास सुरु केला आहे.


