Friday, October 31, 2025

अबब! अहिल्यानगर शहरात किती हा कचरा ,’आराधना वसुंधरेची’ अभियानातून जलस्त्रोत स्वच्छतेचा सकारात्मक संदेश

“अबब! किती हा कचरा!” – ‘आराधना वसुंधरेची’ अभियानातून जलस्त्रोत स्वच्छतेचा सकारात्मक संदेश

अहिल्यानगर – जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने “आराधना वसुंधरेची” या विशेष अभियानांतर्गत जलस्त्रोत स्वच्छता मोहिमेला उत्साही प्रतिसाद लाभला. शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी, शहरातील विविध जलस्त्रोत परिसरात साचलेल्या कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट लावण्याचे कार्य राबवून पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. या दिवशी एकूण ४.५ मेट्रिक टन प्लास्टिक व न कुजणारा कचरा जमा करण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत नगर-पुणे महामार्गावरील ईलाक्षी शोरूमजवळील सीना नदीपात्रात नगर ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेत स्वच्छतेचे काम जोमाने पार पाडले. नदीपात्रात साचलेल्या प्लास्टिक, पॉलिथिन, न कुजणाऱ्या वस्तू व फेकलेल्या वस्त्रांचे जवळपास तीन मेट्रिक टन वजनाचे कचऱ्याचे संकलन करण्यात आले. नदीच्या प्रवाहावर यामुळे निर्माण झालेला अडथळा दूर करत जलचर जीवन व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले.

त्याचप्रमाणे, नगर-मनमाड महामार्गावरील नागापूर पुलाजवळील सीना नदीपात्रात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने स्वच्छता मोहीम राबवली. येथे सुमारे दीड मेट्रिक टन कचरा जमा करण्यात आला. नदीपात्रातील प्लास्टिकच्या थरामुळे नैसर्गिक प्रवाहावर होत असलेल्या परिणामाची तिथल्या स्वच्छतेदरम्यान प्रकर्षाने जाणीव झाली.

दरम्यान, नगर-कल्याण महामार्गावरील बाळाजी बुवा विहिरीत धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विहिरीतील निर्माल्य, प्लास्टिक व प्लास्टर ऑफ पॅरिसचा कचरा काढून परिसर स्वच्छ केला. विहिरीत साचलेल्या या कचऱ्यामुळे भूजल प्रदूषणाची समस्या निर्माण होत असल्याची बाब समोर आली.

स्वच्छतेच्या या उपक्रमात, नदीपात्र व विहिरीतील प्रचंड प्रमाणात गोळा झालेला कचरा पाहून आयुक्त यशवंत डांगे यांनी “अबब! किती हा कचरा!” असे उद्गार काढत चिंता व्यक्त केली. जलस्रोत रक्षणाची तातडीची गरज अधोरेखित करत त्यांनी नागरिकांना जलस्रोत स्वच्छतेसाठी अधिक जागरूक होण्याचे आवाहन केले. त्यांनी सहभागी सर्व स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत स्वच्छतेच्या या लढाईत सातत्याने पुढे चालण्याचे आवाहनही केले.

रविवार, दिनांक २७ एप्रिल रोजीही जलस्त्रोत स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे. स्टेशन रोड पुलाजवळील सीना नदीपात्र, नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदी पात्र आणि आठरे पब्लिक स्कूलजवळील मनपा विहीर येथे स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. आयुक्त डांगेंनी नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, नदीपात्र व जलस्त्रोतांमध्ये कचरा टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. पर्यावरण रक्षणासाठी शिस्तीची गरज असल्याचे अधोरेखित करत, कारवाईबाबत महानगरपालिका ठाम असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles