राज्यात पुढील ४८ तास ( ९ आणि १० जून) हलका ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, घाट भागासह पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आणि अहिल्यानगरसह १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सूनच्या उत्तरी सीमेत बदल नसून, ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाट भागात विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाने शेतकरी आणि स्थानिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे सुचवले आहे, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल.
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा १२ जूननंतर विदर्भात मान्सून घेऊन येईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या नागपुरात तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला असून, उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मे महिन्यात ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसामुळे तापमान सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी कमी होते. मात्र, जूनमध्ये उष्णता वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवस तुरळक पावसासह तापमान असेच राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना उष्म्यापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रत्नागिरीमध्ये रात्रीपासूनच धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली. रत्नागिरीत विजांच्या कडकडाटात पावसाच्या कोसळधारा पडू लागल्यामुळे वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी खंडित करण्यात आला. जिल्ह्याला हवामान खात्याने यलो अलर्ट चा इशारा दिलाय. हवामान खात्याचा इशारा तंतोतंत खरा ठरला असून रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग दिसून आली. पावसाच्या जोरदार सरींमुळे रस्ते देखील जलमय झाले, कोकणात प्रामुख्याने भात शेती केली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणी कामे पूर्ण झाली असून कोवळ्या भात रोपांना मुबलक पाण्याची आवश्यकता असते.रत्नागिरीत ग्रामीण भागातील पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळणार आहे.


