पुणे शहर आणि परिसरात कोयते उगारून दहशत माजविणे, तसेच गाड्यांची मोडतोड अशा प्रकारच्या गुन्ह्यांत गेल्या काही दिवासांमध्ये वाढ झाली. अशा प्रकारच्या गुन्ह्यात सराइतांसह अल्पवयीन मुलांचा देखील सामील असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले आहे. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडीओ सातत्याने समोर येत असताता. अशी दहशत माजविणाऱ्या टोळ्यांना ‘कोयता गँग’ असे नाव देण्यात आले आहे. या नावाची दहशत राज्यभरात पसरली आहे. दरम्यान अशाच एका हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना देखील या पोस्टमध्ये टॅग केले आहे.
काही दिवसांपूर्वी वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी ‘कोयता गँग’च्या दहशतीकडे अधिवेशनात लक्ष वेधले होते, यावर राज्याचे मुख्यमंत्री त्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच माध्यमांनी हे नाव दिल्याचेही फडणवीस सभागृहात म्हणाले होते, याचा उल्लेख देखील रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.
हातात कोयता घेऊन भर रस्त्यात हाणामारी करत असलेल्या दोन गटांचा व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवार म्हणाले, “पुण्यातल्या ‘कोयता गँग’चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँगचा कालचा थरार!” इतकेच नाही तर “पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!” असेही रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान रोहित पवारांनी शेअर केलेला सीसीटीव्ही व्हिडीओ हा पुण्यातील बिबवेवाडी भागातील असल्याची माहिती समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये अगदी वर्दळीच्या रस्त्यावर दोन गटात राडा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये काही तरूण गर्दी करून उभे असल्याचे दिसतात आणि अचानक त्यांच्यात हाणामारी सुरू होते. यावेळी एकजण कोयता काढून समोरच्या व्यक्तीवर वार करताना दिसत आहे. यावेळी हे तरूण एकमेकांना दगड आणि कोयता यासारख्या वस्तूंनी मारहाण करताना दिसत आहेत.
 https://x.com/RRPSpeaks/status/1918505998366499021?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1918505998366499021%7Ctwgr%5Ed9590e6ccbf1f744bf9e8eae9609caef5fae5011%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Frohit-pawar-on-pune-koyta-gang-video-cm-devendra-fadnavis-and-ajit-pawar-crime-news-rak-94-5064959%2F


