नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी अस्तगाव शिवारात मुरमाने भरलेला डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुरमाने भरलेला डंपर (क्रमांक एमएच-17 सीव्ही 3502) बाभळेश्वरकडून राहात्याच्या दिशेने जात होता. त्याच वेळी राहात्याकडून बाभळेश्वरकडे जाणारी दुचाकी (क्रमांक एम एच 17 सिएस 8079) अस्तगाव शिवारातील हॉटेल वसंत बहार समोर आली असता, दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालक श्रीकृष्ण रामेश्वर तारडे याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच प्राण गेला.
अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, अपघाताचे भीषण स्वरूप पाहून डंपर चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. राहाता पोलिसांनी तत्काळ डंपर ताब्यात घेतला असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी चक्रा फिरवली आहेत. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस स्टेशनचे पीएसआय शरद लेंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती हाताळत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटवून विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. याप्रकरणी राहाता पोलीस अधिक तपास करत असून, फरार डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामार्गावर सातत्याने होणार्या या अपघातांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


