अहिल्यानगर -सोशल मीडियावर तरुणीचा फोटो व वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून तिची बदनामी केल्याप्रकरणी नगर सायबर पोलिसांनी दोन फेसबुक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी पीडितेच्या संमतीशिवाय तिच्या नावाचे फेसबुक खाते एका अश्लील चॅटिंग ग्रुपमध्ये परस्पर समाविष्ट केले. या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह संदेश, छायाचित्रे व चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या. तसेच पीडितेच्या वैयक्तिक फेसबुक खात्यावरही लज्जास्पद व मानसिक त्रास देणारे संदेश पाठवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने पीडित तरुणीने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित फेसबुक खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
माळीवाडा बसस्थानक परिसरातुन
जेष्ट महिलेचे मंगळसूत्र लांबविले
माळीवाडा बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिला आपल्या गावी जाण्यासाठी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बसस्थानकावर आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत शिताफीने लंपास केले. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच पीडित महिला तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पितळे करत आहेत.


