अहिल्यानगर -शहरातील कायनेटिक चौक परिसरातील एका २३ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने केवळ तरुणीचा हात धरून तिला धमकावलेच नाही, तर तिच्या नियोजित सासरच्या मंडळींना फोन करून तिचे लग्नही मोडले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी गजराज हॉटेलसमोरून घरी जात असताना तुषार अर्जुन हरेल (रा. येलुलकर चाळ, रेल्वे स्टेशन) याने तिला अडवले. आरोपीने यापूर्वी तिला लग्नाची मागणी घातली होती, मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यास स्पष्ट नकार दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपीने सार्वजनिक ठिकाणी तरुणीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तू दुसर्या कोणाशी लग्न केले तर याद राख, अशी धमकीही त्याने भररस्त्यात दिली.
इतयावरच न थांबता, आरोपीने तरुणीच्या होणार्या सासरच्या मंडळींना संपर्क साधला. माझे आणि तिचे प्रेमसंबंध आहेत, तुम्ही मुलाचे लग्न तिच्याशी करू नका, असे खोटे सांगून त्याने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तुषार हरेल याच्याविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार रोहिणी दरदले करत आहेत.
…………………………………….
महिलेचा पाठलाग करून अश्लील वर्तन
अहिल्यानगर: शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका २० वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही आपल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी गेली असताना ही घटना घडली. त्या ठिकाणी राहणार्या गोरक्षनाथ तांदळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून पीडितेचा वेळोवेळी पाठलाग केला. तसेच पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे अत्यंत घाणेरडे व अश्लील हावभाव केले. तसेच त्याने पीडितेच्या कुटुंबाला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर पोलिसांत धाव घेतली. तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. विविध कलमान्वये आरोपी गोरक्षनाथ तांदळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हवालदार गंगावणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


