Friday, February 27, 2026

मुकुंदनगरमध्ये सोशल मीडियावरील पोस्टवरून युवकावर प्राणघातक हल्ला ; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सोशल मीडियावर माजी नगरसेवक समद खान (समद मेंबर) यांच्या बाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून एका युवकावर शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकी दिल्याची घटना मुकुंदनगर येथे शनिवारी (3 जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. अब्रार मुक्तार शेख (वय 23, रा. आलमगीर, भिंगार) असे जखमी युवकाचे नाव आहे.

त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी (4 जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफजल असीर शेख ऊर्फ अफजल पैलवान, अस्लम असीर शेख ऊर्फ अस्लम पैलवान तसेच इतर चार ते पाच अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मुकुंदनगर भागातून जात होता. अल अमीन ग्राऊंडसमोर गर्दी असल्याने तो थांबला असता, काही मुलांनी त्याला अडवले.

हा तोच मुलगा आहे जो इंस्टाग्रामवर समद मेंबरच्या नावाच्या पोस्ट टाकतो, असे म्हणत जमावातील एकाने त्याला दुचाकीवरून खाली ओढले. त्यानंतर अफजल शेख, अस्लम शेख यांनी तिथे येऊन फिर्यादीला मारहाण केली. मारहाणी दरम्यान, अफजलने फिर्यादीच्या डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली, तर अस्लमने धारदार चॉपरने त्याच्या डोक्यावर वार केला. इतर चार ते पाच अनोळखी मुलांनीही मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रूग्णालयात आणि नंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर उपअधीक्षक दिलीप टिपरसे, सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगरमध्ये दोन गटांत वाद झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. रात्रीच्यावेळी गस्तीत वाढ करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles