जामखेड तालुक्यातील नान्नज गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला तिघांनी लाकडी ठोकळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीच्या नातेवाइकांनी योग्य कलमांतर्गत तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.17 जून 2025 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नान्नज येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. विक्रम बबन कोळी (रा. पोतेवाडी, ता. जामखेड) आपल्या भावाची वाट पाहत हॉटेलमध्ये थांबला होता. पाणी घेण्यासाठी गेल असता, त्याचा पाय चुकून तिथे बसलेल्या सोमनाथ मोहळकर याला लागला. यावरून सोमनाथने विक्रमला शिवीगाळ करत त्याच्याशी वाद घातला आणि “तू खूप माजलास, तुला दाखवतो,” असे म्हणत धमकी दिली.
विक्रम हॉटेलबाहेर आल्यानंतर सोमनाथ मोहळकर, आदिल शेख आणि छोट्या शेख या तिघांनी त्याला घेरले. त्यांनी विक्रमला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी छोट्या शेख याने मटण तोडण्यासाठी वापरला जाणारा लाकडी ठोकळा उचलून विक्रमच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. सोमनाथनेही विक्रमच्या पाठीवर लाथ आणि चेहऱ्यावर मारहाण केली.
या भांडणात विक्रमचा भाऊ रमेश कोळी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण सोमनाथने त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आदिल शेख आणि छोट्या शेख यांनी रमेशलाही शिवीगाळ करत, “आमच्या नादी लागलात तर तुम्हाला संपवू,” अशी धमकी दिली.
विक्रम कोळी याने दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस ठाण्यात सोमनाथ मोहळकर, आदिल शेख आणि छोट्या शेख (सर्व रा. नान्नज, ता. जामखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एस. डी. लोंखडे करत आहेत. जखमीच्या नातेवाइकांनी पोलिसांना निवेदन देऊन योग्य कलमांतर्गत कारवाई आणि आरोपींची तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.


