नगर तालुक्यात- मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळुंज गावच्या शिवारात १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास उघडकीस आली. प्रथमेश बाळू साळवे (वय २२, रा. वाळुंज, ता,नगर) असे मयत युवकाचे नाव आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी पहाटे पासूनच मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वाळुंज शिवारातील मेडका ओढ्याला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात प्रथमेश साळवे हा युवक वाहून गेला. त्याचा ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने शोध घेतल्यावर सायंकाळी ५ च्या सुमारास तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णवाहिका बोलावून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. शिंदे यांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतचा अहवाल नगर तालुका पोलिसांना देण्यात आला. त्यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.मंगेश खरमाळे हे करीत आहेत.


