अहिल्यानगर -शहरातील कायनेटिक चौक परिसरात दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून एका युवकाकडून मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 12 हजार रूपयांचा ऐवज हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (7 ऑक्टोबर) पहाटे एकच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हसनेन मोहम्मदपजीर शेख (वय 23, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तो व त्याचे मित्र मोहम्मद समीर व मोहम्मद इम्रान हे तिघे स्वप्निल साई सुर्या हॉटेल येथे वेटर म्हणून काम करतात. मंगळवारी पहाटे 1 वाजता हॉटेलमधील काम आटोपून तिघेजण रूमकडे परतत असताना रणजित हॉटेलजवळ दोन अनोळखी इसम दुचाकीवर आले. त्यांनी दुचाकी आडवी लावून खिशातील मोबाईल व पैसे बाहेर काढा असा दम दिला.
फिर्यादी व त्याच्या मित्रांनी नकार दिल्यावर हे दोघे इसम काही अंतरावर जाऊन पुन्हा परत आले. त्यातील मागे बसलेल्या इसमाने चाकू दाखवत फिर्यादीवर झडप घातली व मारहाण करून जबरदस्तीने त्याच्या खिशातील दोन हजार रूपये व मोबाईल असा एकूण 12 हजार रूपयांचा ऐवज हिसकावून पळून गेले. घटनेनंतर फिर्यादीचे मित्र घाबरून गेले व तत्काळ दुसर्या मित्राला संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले. या घटनेबाबत फिर्यादी हसनेन शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.


