अहिल्यानगर-आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करत पाथर्डी तालुक्यातील अनेक तरूणांच्या नातेवाईकांकडून तब्बल 59 लाख 50 हजार रूपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तालुक्यातील चुंभळी येथील सेवानिवृत्त नौदल कर्मचारी वैजीनाथ गहिनीनाथ ढाकणे (वय 63) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात कल्याण येथील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र पुंडलीक वारगडे, रविकुमार उर्फ प्रविणकुमार राजेंद्रनाथ तिवारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादीनुसार, ढाकणे हे नौदलातून 2024 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण झाले असून त्या नोकरीच्या शोधात होत्या. नौदलातील ओळखीचा जितेंद्र वारगडे याने नोव्हेंबर 2024 मध्ये संपर्क साधून अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तसेच केडीएमसी ठाणे येथील आरोग्य सेवक व लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेतील वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी प्रत्येकी 13 लाख रूपये द्यावे लागतील, असे सांगितल्याचा आरोप आहे.त्यानंतर कल्याण येथील एका हॉटेलमध्ये ढाकणे व अन्य व्यक्तींची वारगडे आणि तिवारी यांच्याशी भेट झाली. यावेळी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत रोख रक्कम घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढे ढाकणे, त्यांचे चुलत भाऊ, मेव्हणे, पुतणे व भाचे अशा अनेकांकडून तिवारी याच्या बँक खात्यावर आरटीजीएस तसेच फोन-पेच्या माध्यमातून लाखो रूपये पाठविण्यात आले.
फिर्यादीनुसार, ढाकणे यांनी स्वतः 15 लाख रूपये, तर त्यांच्या चुलत भावाने 20 लाख 99 हजार रूपये दिले. तसेच अन्य नातेवाईकांकडूनही लाखो रूपये घेण्यात आले. असे एकूण 59 लाख 50 हजार रूपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक करण्यासाठी संशयित आरोपींनी उमेदवारांना मुंबईतील जे. जे. रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले. त्यासाठी ई-मेलवर पत्र पाठविण्यात आले होते. 5 मे 2025 रोजी उमेदवारांना जे. जे. रूग्णालयात नेण्यात आले. तेथे तिवारी व अन्य एक व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांना ई-मेल दाखवून उमेदवारांची नोंदणी व वैद्यकीय तपासणी करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर 11 जुलै 2025 रोजी तिवारी याने उमेदवारांची कथित अंतिम निवड यादी व्हॉट्सअॅपवर पाठविली.
मात्र, त्यानंतर फिर्यादी यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेत चौकशी केली असता 2023 मधील आरोग्य सेवक भरती प्रक्रियेत वेटिंग लिस्टमधील कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत चौकशी केली असता तेथेही अशीच माहिती मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी व नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर वैजीनाथ ढाकणे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत वारगडे व तिवारी यांच्याविरूध्द फिर्याद दिली. नोकरीचे आमिष, बनावट कागदपत्रे व विविध बँक व्यवहारांच्या माध्यमातून मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे पुढील तपास करीत आहे.


