राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रखडल्या होत्या. या निवडणुकांसाठी अखेर प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात पावले उचलली आहेत. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. यामुळे नगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.ग्राम विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार १४ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी २१ जुलै पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. आलेल्या हरकती आणि त्यावरील अभिप्राय विभागीय आयुक्तांना सादर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना २८ जुलै पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असून त्यासाठी विभागीय आयुक्तांना १९ ऑगस्ट २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना १८ ऑगस्ट पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.


