माजी सैनिकांसाठी राजकीय आरक्षणाची मागणी
त्रिदल, जय हिंद व दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघाच्या वतीने निवेदन
राज्य सरकार व राज्यपालांकडेही पाठपुरावा
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ, जय हिंद फाऊंडेशन व दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघाच्या वतीने माजी सैनिक, शहीद परिवार व सैनिक परिवारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना देण्यात आले. राज्यभरातून या मागणीचा जोर वाढू लागला आहे.
यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघाचे गोवर्धन गर्जे, संजय म्हस्के, मारुती ताकपेरे, आबासाहेब कांडेकर, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, संजय पाटेकर, भाऊसाहेब पालवे, दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघाचे भारत खाकाळ, भगवान डोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील माजी सैनिक बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे यासाठी संघटनांनी ठोस मागणी केली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका अशा प्रत्येक ठिकाणी माजी सैनिकांसाठी किमान एक सदस्यत्व राखीव ठेवावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याचबरोबर राज्यपाल नियुक्त आमदार, विधान परिषद, राज्यसभा व लोकसभेत माजी सैनिकांना प्रतिनिधित्व मिळावे, अशीही मागणी करण्यात आली. शिक्षक मतदारसंघाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सात विभागांमध्ये सात स्वतंत्र सैनिक मतदारसंघ निर्माण करून त्यातून सात माजी सैनिकांना आमदार करण्याचा प्रस्तावही संघटनांनी मांडला आहे.
मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी राज्यभरातील विविध जिल्ह्यांत एकाचवेळी निवेदने देऊन हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल तसेच राज्य निवडणूक आयुक्तांना देखील निवेदन पाठविण्यात आले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील माजी सैनिकांना हवंय राजकीय आरक्षण
- Advertisement -