फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, अहिल्यानगर शाखेमार्फत सुमारे 33 लाख 21 हजार रूपयांच्या कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बँकेचे वरिष्ठ अधिकारी दिगंबर संदीपान फुले (वय 30, रा. कळस, ता. जि. पुणे) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (8 ऑक्टोबर) दिलेल्या फिर्यादीवरून सहा कर्जदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्जदार सुलताना फकरोद्दीन सय्यद, रौकीब फकरोद्दीन सय्यद (दोघे रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी), अमोल पोपट शिंदे, जयश्री अमोल शिंदे (दोघे रा. माधव बाबा चौक, सोनई, ता. नेवासा), विकास सुनील भुजबळ, सायली रमेश जाधव (दोघे रा. येळपणे, पिसोरे बु., ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दिगंबर फुले यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. रिजनल ऑफिस, पुणे येथे सिनियर मॅनेजर (फ्रॉड कंट्रोल युनिट) म्हणून नोव्हेंबर 2023 पासून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, बँकेच्या अहिल्यानगर शाखेमार्फत सहा कर्जदारांनी बनावट ग्रामपंचायत दाखले, नकाशे, कर पावत्या, व गावठाण प्रमाणपत्रे सादर करून कर्ज मंजूर करून घेतले.
सुलताना सय्यद व रौकीब सय्यद यांनी मालमत्ता क्र. 470 गहाण ठेवून 7 लाख 58 हजार रूपयांचे कर्ज घेतले. चौकशीत त्यांच्याकडून सादर केलेली ग्रामपंचायत कागदपत्रे, नकाशे व शिक्के बनावट असल्याचे उघड झाले. अमोल शिंदे व जयश्री शिंदे यांनी मालमत्ता क्र. 988 गहाण ठेवून 12 लाख 88 हजार रूपयांचे कर्ज घेतले. सोनई ग्रामपंचायतीची ठराव प्रमाणपत्रे, करपावत्या व इतर दस्तऐवज खोटे असल्याचे तपासात समोर आले. विकास भुजबळ व सायली जाधव यांनी मालमत्ता क्र. 1324 गहाण ठेवून 12 लाख 75 हजार रूपयांचे कर्ज घेतले. येळपणे ग्रामपंचायतीचे व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र, गावठाण दाखले व कर पावत्या हे सर्व बनावट आढळले.
या सर्व प्रकरणांमध्ये बँकेच्या तांत्रिक एजन्सी सागर लोढा, क्रेडीट मॅनेजर गोविंद परदेसी, आकाश अस्कल आणि प्रितम घोलप, तसेच ब्रँच मॅनेजर शत्रुंजय साटणकर यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन कर्ज मंजुरीसाठी अहवाल दिला होता. मात्र, नंतर तपासात कर्जदारांनी सादर केलेली सर्व ग्रामपंचायत प्रमाणपत्रे व शिक्के बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या कर्जांपैकी एकाही कर्जदाराने हप्त्यांची नियमित परतफेड केली नाही. परिणामी, बँकेला एकूण 33 लाख 21 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.


