राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर या खासदारांचा यामध्ये समावेश आहे.
या ६ खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा शिंदेंच्या सेनेकडून केला जातो. मात्र, या ६ खासदारांच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात होतं. या सर्व घडामोडीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलेल्या ६ बंडखोर खासदारांच्या शिंदे सेनेतील विलीनीकरणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटून शिंदेंच्या सेनेत गेलेल्या या ६ बंडखोर खासदारांची खासदारकी जाणार असल्याचा दावा सातत्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. त्या संदर्भात ठाकरे गटाने कायदेशीर पावलं टाकण्यास सुरूवातही केली होती असंही सांगितलं जात होतं. मात्र, असं असतानाच आज (१८ जुलै) लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षातील ६ खासदारांच्या शिवसेना (शिंदे) पक्षात विलीनीकरणास मान्यता दिली असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटून शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलेल्या या ६ खासदारांच्या शिवसेना (शिंदे) पक्षात विलीनीकरणास लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यामुळे आता हे ६ खासदार शिंदेंच्या सेनेचा अधिकृत भाग असणार आहेत. तसेच या निर्णयामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची लोकसभेतील खासदारांची संख्या वाढली आहे.
आम्ही कोणताही पक्ष तोडण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचे काम करतो. त्यामुळेच आमच्याकडे जे सहा खासदार आले, त्यांच्या मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. जनतेप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते आमच्याकडे आले आहेत. आमची त्यांना पूर्ण साथ असेल. त्यांच्या मतदारसंघात चांगले विकासकाम होईल. त्यांना चांगला विकासनिधी मिळेल, असे आश्वास त्यांनी दिले.तसेच, ज्यांना लोक निवडून संसदेत पाठवतात तेव्हा त्यांच्या मतदारसंघात काम व्हावे, अशी त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते. जेवढे सहा खासदार आमच्याकडे आले आहेत, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला नाही. जे आमच्यावर आरोप करतात, त्यांना हे खोटे वाटेल. वैयक्तिक स्वार्थासाठी ते आमच्याकडे आलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या सहा खासदारांना आम्ही निधी देणार आहोत. त्यासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्या खासदारांची भेट करून दिली, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.


