Tuesday, November 4, 2025

नगरमध्ये मराठा समाजाची लग्न समारंभासाठी आचारसंहिता जाहीर ; अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती

Ahilyanagar राज्यात खळबळ उडवून देणार्‍या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर नगरमध्ये मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता तयार केली आहे. यावेळी आयोजित बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली. हुंडा घेऊ नका, देऊ नका, याबरोबरच लग्नात डिजे व प्री-वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणार्‍या तीन पालकांचा समाजाच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली.

नगरमध्ये हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, मराठासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, किशोर मरकड, मराठा वधू-वर सूचक मंडळाचे अशोक कुटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, विठ्लराव गुंजाळ, सीए ज्ञानेश्वर काळे आदींसह समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. हभप तनपुरे महाराज म्हणाले, समाजाने अनिष्ठ रूढींना तिलांजली द्यावी. समाजात बदल करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:मध्ये बदल करावा. सर्वांनी एकत्र येऊन लग्नसमारंभातील आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे. त्यासाठी तालुक्यात समिती स्थापन करण्यात यावी.डॉ. निमसे म्हणाले, लग्नसोहळ्याच्या आचारसंहितेची जनजागृती घेण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकारांनी पुढाकार घ्यावा. हुंडाबळी याबरोबरच समाजातील ग्रामीण मुलांच्या विवाहाची समस्या मोठी आहे. यावरही गांभीर्याने विचार करावा लागेल. या वेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर जाहीर केलेल्या आचारसंहितेत पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. मराठा समाजाने लग्न सोहळा 100-200 लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा. डीजेऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांचा वापर करावा. प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. लग्न वेळेवरच लावावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक उद्योजक एन.बी.धुमाळ यांनी केले. या आचारसंहितेला पद्मश्री पोपटराव पवार, आ. शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, इंजिनियर विजयकुमार ठुबे यांनी सहमती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. दशरथ खोसे यांनी आभार मानले.

मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच आत्महत्या होत आहे. यामुळे कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. लग्न समारंभात नाचणार्‍या तरुण-तरुणींना पायबंद घालावा. लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात साड्या, भेटवस्तू देऊ नयेत. त्याऐवजी पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्यांचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये. लग्नात हुंडा देऊ, घेऊ नये. त्याऐवजी मुलीच्या नावावर एफडी करावी. लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मुलीशी मोबाईलचा वापर गरजे पुरताच करावा. पैशासाठी सुनेचा छळ करू नये. समाजातील नव उद्योजक/व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्घाटन कार्यक्रमाला आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्यावा. विविध कार्यक्रमानिमित्त होणार्‍या भोजनप्रसंगी, अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, सुकी भोजन पाकीट व्यवस्था असावी किंवा जेवणात 5 पेक्षा जास्त पदार्थ नकोत. लग्न आणि दशक्रियाविधीला मान्यवरांचे आशीर्वाद, श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा, गरज वाटल्यास श्रद्धांजलीसाठी वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावी. लग्नात दोन्ही बाजूने बस्ता व मानपान ज्याचे त्याने करावे. मराठा समाजासाठी सुचवलेली आचारसंहिता लग्न समारंभात वाचून दाखवावी. जिथे शक्य आहे, तिथे नवरा नवरीचे हस्ते पाच झाडे लावावीत. दशक्रियाविधी पाचव्या दिवशी करण्यात यावा. दशक्रिया व तेराव्याच्यानिमित्ताने घातली जाणारी भोजनावळ बंद करावी. लग्न आचारसंहितेचे योग्यप्रकारे पालन उत्कृष्टपणे करणार्‍या तीन पालकांचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles