Saturday, February 21, 2026

केंद्रीय तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी नम्रता आणि कर्तव्यभावना जपावी

सनदी सेवेतील अधिकाऱ्यांनी नम्रता आणि कर्तव्यभावना जपावी

अहिल्यानगर

” केंद्रीय तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांवर सामाजिक न्याय आणि विकासाची मोठी जबाबदारी येते. देशसेवेची अमूल्य संधी मिळालेल्या अधिकार्‍यांनी आपल्या अधिकाराचा आणि प्रतिष्ठेचा गर्व न बाळगता नम्रता आणि कर्तव्यभावना जपून काम करावे , असे आवाहन ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी शरदचंद्र बेहर यांनी केले. मध्यप्रदेशचे माजी मुख्य सचिव , तेथील मुख्यमंत्र्यांचे दीर्घकाळ प्रमुख सल्लागार आणि दोन विद्यापीठांचे संस्थापक कुलगुरू म्हणून काम केलेल्या श्री.बेहर यांनी पुढे सांगितले की, प्रामाणिक आणि संवेदनशील राहून केलेल्या कामांमुळेच सनदी सेवकांचे समाज दीर्घकाळ कृतज्ञतेने स्मरण ठेवतो.

स्नेहालय संस्थेचा युवानिर्माण प्रकल्प आणि राजमुद्रा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशवंतांचा नागरी सत्कार श्री शरद चंद्र बेहर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आर्मड कॉर्पसचे मेजर राजेश मंडल, निवृत्त जिल्हा परिषद मुख्य अधिकारी नितीन थाडे, राजमुद्रा अकादमीच्या संचालिका नंदाताई पांडुळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मीरा बेहर, स्नेहालयाच्या विश्वस्त सौ.सपना आसावा , राजीव कुमार सिंग आदींनी संवाद केला.
यावेळी रोटरी क्लबचे वर्ष 2027- 28 करिता प्रांतपाल म्हणून निवड झाल्याबद्दल क्षितिज झावरे यांचा गौरव करण्यात आला.

मेहेकरी ( ता. जि. नगर) येथे श्री. श्रीकांत आणि अशोक हिरे तसेच श्रीमती शुभांगी दशपुत्रे यांच्या सहयोगातून स्व. जी. एन. हिरे वकील यांच्या स्मरणार्थ श्री सद्गुरु अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा केंद्र स्नेहालयने वर्ष 2020 मध्ये सुरू केले. राजमुद्रा अकादमीच्या यशवंतांप्रमाणेच श्री सद्गुरु केंद्रातील पोलीस आणि सरळ सेवा भरतीतील उमेदवारांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

सर्वश्री ओंकार मीनाक्षी राजेंद्र खुंटाळे, अभिजीत सहदेव आहेर आणि ज्ञानेश्वर बबनराव मुखेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परीक्षा उत्तीर्ण होताना आलेल्या आव्हानांची माहिती आपल्या मनोगतात दिली. सुयोग्य मार्गदर्शन, प्रचंड चिकाटी आणि आपल्या ध्येयावरील अढळ विश्वास ही शिदोरी सोबत असेल तर स्पर्धा परीक्षेचे चक्रव्यूह भेदता येते, असे या यशवंतांनी सांगितले.

हनीफ शेख आणि विकास सुतार यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागील युवानिर्माण प्रकल्पाची भूमिका विशद केली.

यावेळी केडगाव येथील सक्षमा केंद्रातील रुग्णसेवा कक्षाला मीरा शरदचंद्र रुग्णसेवा कक्ष असे नाव मेजर मंडल यांच्या शुभहस्ते देण्यात आले. समाज विकासात विनम्रतेने आणि प्रामाणिकतेने अनमोल योगदान देणाऱ्या सर्व सनदी सेवकांच्या सन्मानार्थ हे नामकरण करण्यात आल्याचे श्री राजीव कुमार यांनी नमूद केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles