डॉ. सुरश्री सोनवणे यांना पर्यावरणशास्त्र विषयात पीएच.डी.
अहिल्यानगर : पर्यावरणशास्त्र विषयातील संशोधक सुरश्री सुरेंद्रकुमार सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून पर्यावरणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या संशोधनाचा मौखिक परीक्षेचा टप्पा १८ सप्टेंबर २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडला.
डॉ.सुरश्री सोनवणे यांनी पदव्युत्तर संशोधन केंद्र, पर्यावरणशास्त्र विभाग, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, अहिल्यानगर येथून आपले संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘भूजलामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या भू-विद्युतचुंबकीय क्षेत्राची ओळख व रुंदी मोजण्यासाठी लेझर प्रकाश किरणाचा उपयोग’ असा आहे. या संशोधनामध्ये भूजलामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या भू-विद्युतचुंबकीय क्षेत्राची (Geoelectromagnetic field) ओळख व त्याची रुंदी मोजण्यासाठी लेझर प्रकाश किरणावर आधारित तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात आला आहे.
या संशोधनासाठी बारामती परिसराचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. विविध ठिकाणी ग्रिड पद्धतीने सर्वेक्षण करून Copper L-Rods, GP-3D-WL तसेच नव्याने विकसित केलेल्या Laser Light Beam उपकरणाचा वापर करण्यात आला. या माध्यमातून भूजलाशी संबंधित Geoelectromagnetic Field ची व्याप्ती व रुंदी मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला. पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत Laser Light Beam पद्धतीची उपयुक्तता व कार्यक्षमता तपासण्यात आली.
भूजल हे पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी महत्त्वाचे नैसर्गिक साधन आहे. त्यामुळे भूजलाशी संबंधित पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करून सुरक्षित व शाश्वत बांधकाम नियोजनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे हा या संशोधनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर भूजलाशी संबंधित भू-विद्युतचुंबकीय क्षेत्राची ओळख व त्याची रुंदी मोजण्यासाठी तुलनेने कमी खर्चातील लेझर प्रकाश किरण तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेचा अभिनव अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे.
हे संशोधन मार्गदर्शक डॉ. नंदकुमार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहमार्गदर्शक डॉ. सतीश कुलकर्णी यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. संशोधनाच्या विविध टप्प्यांमध्ये मिळालेले मार्गदर्शन, सहकार्य व प्रोत्साहन याबद्दल डॉ. सुरश्री सोनवणे यांनी मार्गदर्शकांचे आभार मानले.
डॉ. सुरश्री सोनवणे यांनी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख व सहाय्यक प्राध्यापिका म्हणून सात वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी सांभाळली आहे. अध्यापनासोबतच पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, शाश्वत विकास, पर्यावरण जनजागृती, हरित परिसर उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.सध्या त्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथील पर्यावरणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल मार्गदर्शक, सहमार्गदर्शक, कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार आणि विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
डॉ सूरश्री ह्या हिंगनगावच्या प्रथम महिला सरपंच सौ स्मिताताई आणि हिंगनगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तसेच रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य व सरपंच परिषद राज्य कोअर कमिटी प्रमुख श्री. सुरेंद्रकुमार ऊर्फ आबासाहेब सोनवणे पाटील यांची कन्या आहेत…
नगर मधील प्रतिथयश डॉ.विलास सोनवणे व इंजीनियर भालचंद्र सोनवणे यांच्या पुतणी व न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे माजी प्राचार्य खासेराव शितोळे व दिवंगत माजी प्राचार्य कै बळवंतराव नागवडे यांच्या भाची आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल जि.म.वि.प्र. संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र दरे साहेब, सचिव अॅड विश्वासराव आठरे, जेष्ठ विश्वस्त प्रा.सीताराम खिलारी,आदर्श गाव योजना समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष डॉ पद्मश्री पोपटराव पवार,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री दत्ताभाऊ काकडे आदी मान्यवरांनी खास अभिनंदन केले आहे.


