निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना सरसावली.
पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत नगरमध्ये पदाधिकारी मेळावा.
महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत होणार मेळाव्यात चर्चा.
नगर (प्रतिनिधी)- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेना सरसावली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील माऊली संकुल येथे होणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहर संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, शाम नळकांडे आदी उपस्थित होते. जाधव पुढे म्हणाले, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत मुंबईत गत महिन्यात बैठक झाली. त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केलेल्या आहेत. अहिल्यानगरचे संपर्कमंत्री शंभुराज देसाई शनिवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख शिंदे म्हणाले, राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बैठका घेण्यात येत आहेत. संभाजी कदम म्हणाले, शहरासह ग्रामीण भागातील काही नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांचे प्रवेश शनिवारी होणाऱ्या बैठकीत होणार आहेत.
चौकट.
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, शिवसेनेचे (ठाकरे गट) श्रीरामपूर शहराध्यक्ष संजय छल्लारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली.
महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना सरसावली,मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत नगरमध्ये मेळावा
- Advertisement -


