Saturday, February 21, 2026

राहुरीतील डॉ. तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी अरुण तनपुरे

अहिल्यानगर: राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अरुण बाबुराव तनपुरे यांची आज, गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कारखाना डिसेंबरमध्ये सुरू करण्याचा मानस त्यांनी निवडीनंतर झालेल्या सभेत बोलताना जाहीर केला.

श्री. अरुण तनपुरे यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. श्री. तनपुरे यांच्या नावाची सूचना भारत वारुळे यांनी केली तर रावसाहेब तनपुरे यांनी अनुमोदन दिले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्व म्हणजे २१ जागा मोठ्या मताधिक्याने पटकाविल्या.

निवडीनंतर झालेल्या सभेत श्री. तनपुरे म्हणाले, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. निवडणुकीपूर्वी अभ्यास करून कारखाना कसा चालविता येईल, याविषयी माहिती घेतली, नंतरच निवडणुकीत उतरलो. कारखाना सुरू करणे अवघड असले तरी सभासदांच्या पाठबळावर शिवधनुष्य उचलले आहे. येत्या डिसेंबरमध्ये कारखाना चालू करण्याचा मानस आहे. पुढील वर्षात अधिक जोमाने व पूर्ण क्षमतेने कारखाना चालविला जाईल. निळवंडे धरणाचे पाणी आल्याने उसाचे क्षेत्र अधिक वाढेल. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कारखाना बंद अवस्थेत आहे. यंत्रसामुग्रीची स्थिती पाहून आव्हानात्मक काम वाटते. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.

संलग्न संस्थाही महत्त्वाच्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात आणखी वाढीसाठी प्रयत्न करू. नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. सभासदांच्या विश्वासास तडा जाणार नाही, अशी ग्वाही श्री. तनपुरे यांनी दिली. यावेळी संचालक रावसाहेब तनपुरे, सुरेश वाबळे, एस. एम. पाटील, मच्छिंद्र सोनवणे, नवाज देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, कामगार नेते अर्जुन दुशिंग आदींची भाषणे झाली. दत्तात्रय कवाने यांनी सूत्रसंचालन तर संचालक हर्ष तनपुरे यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles