नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना जुलै महिन्यात 50% रकमा मिळण्याचा मार्ग मोकळा – अवसायक गणेश गायकवाड यांची माहिती
नगर : अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% इतकी रक्कम जुलै महिन्यात मिळणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.
याबाबत डी आय सी जी सी यांचेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार डी आय सी जी सी कार्यालयाकडून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र नुकतेच बँक प्रशासनास प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त ठेव रक्कम असलेल्या व विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म व केवायसी अपडेट केलेल्या 1926 ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% इतकी रक्कम जुलै महिन्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर ठेवी परत करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे आरबीआय शी निगडित कामकाज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर या रकमा ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.


