शहरात मोहीम राबवून महानगरपालिकेमार्फत ६५० टन हरित कचऱ्याचे संकलन
हरित कचरा संकलनासाठी प्रशासनाकडून कॉम्पॅक्टर, जेसीबी, डंपर उपलब्ध
झाडांच्या फांद्या, पालापाचोळा उचलण्यासाठी उद्यान विभागाशी संपर्क साधावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – गेल्या महिनाभरात शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटून पडल्या होत्या. महावितरण कंपनीने दुरुस्तीवेळी तोडलेल्या फांद्याही त्याच ठिकाणी पडून होत्या. महानगरपालिकेने मोहीम राबवून गेल्या काही दिवसात झाडांच्या फांद्या, पालापाचोळा असा सुमारे ६५० टन हरित कचरा संकलित केला आहे. दरम्यान, अद्यापही ज्या भागात हरित कचरा साचलेला असेल, तेथील नागरिकांनी उद्यान विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
पावसामुळे वीज वाहिन्या, खांबांवर झाडे पडून अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या वाढल्या होत्या. महावितरण कंपनीने या झाडांच्या फांद्या तोडून दुरुस्ती केली. मात्र, त्या फांद्या तेथेच टाकण्यात आल्या. या झाडांच्या तुटलेल्या फांद्या, पालापाचोळा साचल्याने परिसरात अस्वच्छता झाल्याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या हरित कचऱ्याचे संकलन करण्याची मोहीम राबवून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले होते. त्यासाठी दोन कॉम्पॅक्टर, जेसीबी, डंपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उद्यान विभागामार्फत शहराच्या विविध भागातील हरित कचरा संकलित करण्यात आला व त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
दरम्यान, वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीवेळी झाडांच्या फांद्या तोडताना महानगरपालिकेला, उद्यान विभागाला पूर्व कल्पना द्यावी, अशा सूचना महानगरपालिकेने महावितरण कंपनीला दिल्या आहेत. त्यामुळे फांद्या तोडल्यावर त्या तत्काळ उचलता येतील. याबाबत महानगरपालिकेने महावितरण कंपनीला पत्रही दिले आहे. तसेच, अद्यापही ज्या भागात हरित कचरा साचलेला असेल तेथील नागरिकांनी उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान (मोबाईल क्रमांक 9765137192) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.


