चार्टर्ड अकाउंटंट्सकडून व्यावसायिकाची फसवणूक ,नगर शहरातील घटना

अहिल्यानगर-गंजबाजार परिसरातील ‘सूर्या हॉलमार्किंग्स’ च्या व्यावसायिकाची 38 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघा जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी (24 जून) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश भोसले (वय 44, रा. गजराज टॉवर, सारसनगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, त्यांनी शेंगा गल्ली, गंजबाजार येथे सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग व्यवसाय सुरू केला होता. 2021 पासून त्यांनी फर्मसाठी आवश्यक असलेले जीएसटी व इन्कम टॅक्स प्रक्रिया करण्यासाठी सीए सचिन दुधाडे व देवेंद्र पाटील यांच्यावर विश्वास ठेवून काम दिले होते.

दुधाडे व पाटील यांनी एसपी असोसिएट्स व एसडी असोसिएट्स या नावाने काम करत असल्याचे सांगितले. त्यांनी पुणे व सातारा येथे ऑडिट ऑफीसेस असल्याचा बनाव करत, विविध बँका व कंपन्यांचे कर सल्लागार असल्याचेही सांगून भोसले यांच्याकडून जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली वेळोवेळी 18 लाख 31 हजार 299 रूपये उकळले. यानंतर, सोनाली लोणकर या महिलेला अर्णव एंटरप्रायझेस नावाने भागीदारी फर्म दर्शवून पुण्यातून कर प्रक्रिया चालेल असे सांगण्यात आले. त्यानंतर आणखी 1 लाख 50 हजार रूपये रोख स्वरूपात घेतले गेले.

दरम्यान, 2022-23 व 2023-24 चे ऑडिट रिपोर्ट, जीएसटी प्रमाणपत्रे, चलने हे सर्व खोटे व बनावट होते, जे जीएसटी कार्यालयात तपासणी दरम्यान भोसले यांना समजले. भोसले यांनी जेव्हा ही कागदपत्रे सीए किरण भंडारी यांना तपासण्याकरिता दिली, तेव्हा त्यांनी त्याची खात्री केली असता संबंधित फर्मचे कोणतेही जीएसटी भरणे झालेच नव्हते. त्यामुळे आता शासनाकडून 38 लाख रूपये दंडासहित वसूल होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण फसवणूक प्रकरणी भोसले यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन दुधाडे (रा. माहेश्वरी पार्क, भिस्तबाग महाल), देवेंद्र पाटील (रा. यशोदासागर, पाईपलाईन रस्ता) व सोनाली लोणकर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles