मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात विद्यार्थी उपोषणाला बसले – पालक आणि माजी विद्यार्थ्यांचा देखील सहभाग
रयत शिक्षण संस्था कार्यालयासमोर पालक संघ समितीच्या वतीने १ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू; शाळा पूर्णतः बंद
अहिल्यानगर – लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा, कापड बाजार, अहिल्यानगर येथील मुख्याध्यापक मा. श्री शिवाजीराव लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि पालक संघ समितीच्या वतीने उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालय, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर येथे सुरू असून, शेकडो पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “लंके सरांची बदली रद्द करा”, “आमचे लाडके शिक्षक परत द्या”, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. शाळेच्या इमारतीत पूर्णतः शिकवणी बंद असून, विद्यार्थी उपोषण स्थळीच थांबले आहेत. यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज ठप्प झाले आहे.
यासंदर्भात पालक संघाने २८ जून रोजी संस्थेला लेखी पत्राद्वारे आंदोलनाची पूर्वसूचना दिली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांनी थेट उपोषण सुरू केले आहे.
पालक संघाचे प्रतिनिधी म्हणाले की, “लंके सर हे अत्यंत निष्ठावान, विद्यार्थीप्रिय व कार्यक्षम शिक्षक आहेत. त्यांनी शाळेचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यांची अचानक बदली म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे ही बदली रद्द होईपर्यंत आमचे उपोषण सुरू राहणार आहे.”
आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, आजी-आजोबा, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून, उपोषणाचे स्वरूप दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे.


