अहिल्यानगर-येथील पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व इतर शाखांतील सर्व पोलीस अंमलदारांसाठी दररोज बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी लावणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने ही अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्यात येणार आहे.हजेरी प्रक्रियेत पारदर्शकता, नियमितता आणि कर्मचारी उपस्थितीचा अचूक लेखाजोखा ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक शाखा प्रमुखाने आपल्या अधिनस्त कर्मचार्यांची बक्कल क्रमांकासह यादी तातडीने सादर करावी, अशा सूचना कार्यालयीन अधीक्षक सोपान काळभोर यांनी दिल्या आहेत. ही यादी कार्यालयीन शिपायामार्फत लेखा शाखेत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सायबर सेल, मोबाईल युनिट, आर्थिक गुन्हे शाखा, लेखा विभाग, आस्थापना, विभागीय चौकशी शाखा यांच्यासह सर्व शाखांचा समावेश करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात येणार्या लिपिकवर्गीय कर्मचारी आणि पोलिसांसाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचार्यांना आता कार्यालयीन वेळेत यावे लागणार आहे. मात्र काही कर्मचार्यांनी याला छुपा विरोध दर्शविला आहे. आम्ही उशीरा आलो तरी आम्ही उशीरापर्यंत कार्यालयात थांबतो असे काहीचे म्हणणे आहे. मात्र अधीक्षक घार्गे यांनी आदेश काढल्याने याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे समजते. सध्या या आदेशाची अंमलबजावणी कशी केली जाते आणि संभाव्य विरोधाचा कोणता परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


