शिक्षकाने मोबाईल टॉर्च व आरशाच्या सहाय्याने अंधारल्या वर्गात आणला प्रकाश
विद्यार्थ्यांनी वर्गात साकारला भौतिकशास्त्रातील प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम
अहिल्यानगर-
बाहेर आभाळ अंधारलेले व मुसळधार पाऊस,लाईट गेल्यामुळे वर्गात अंधार अन इन्वर्टरचीही बॅटरी संपलेली,गच्च भरलेल्या वर्गात मुलांना एकमेकांचे चेहरे देखील दिसत नाही.अशा परिस्थितीत वर्गशिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी भौतिकशास्त्रातल्या प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमाचा वापर करत स्वतःकडील दोन टॅब व दोन मोबाईलचे टॉर्च चालू करून विशिष्ट कोनांमध्ये आरशावर धरत वर्गात प्रकाश आणला.या वैज्ञानिक उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात हा प्रसंग घडला.शिक्षकांच्या स्टाफरूममधील आरसा आणून वर्गातील दोन-तीन उंच मुलांनी आळीपाळीने बाकावर उभे राहून शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मोबाईल टॉर्चचे प्रकाशझोत विविध कोनांमधून आरशावर धरले.टॉर्चच्या प्रकाशाचे आपाती किरण आरशावर पडले व परावर्तित किरणांच्या रूपाने आरशातून बाहेर पडून विद्यार्थ्यांमध्ये प्रकाशाच्या रूपाने गेले.अन चार मोबाईल टॉर्चचा प्रकाश दुप्पट होऊन सगळ्या वर्गात खेळला.
गुगल,मायक्रोसॉफ्ट,ॲप्पल तसेच इस्रो-नासा एज्युकेटर म्हणून विज्ञानासाठी काम करणारे शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी प्रसंग ओळखत भौतिकशास्त्राचा चपखल वापर वर्गात करून घेतला.यात मुलांनी आनंदाने आपले वाचन व लेखन कार्य करून घेतले.
जेव्हा प्रकाश एका पृष्ठभागावर आदळतो आणि त्याच कोनातून व माध्यमातून परत येतो, तेव्हा त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात.आरसा,पाणी किंवा चमकदार पृष्ठभागावर प्रकाश परावर्तित होतो.भौतिक शास्त्रातील या सिद्धांताचे जणू प्रात्यक्षिक या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिले व स्वतः देखील सहभाग घेतल्यामुळे मुलांना आनंद झाला.श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी तसेच प्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक,पालक,विद्यार्थी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.


