नगर (सचिन कलमदाणे) : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिकाकडून प्रारूप गट, प्रभाग रचना बनविण्याचे काम सुरु आहे. अहिल्यानगर महापालिकेतही प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांचे लक्ष या प्रभाग रचनेकडे लागले आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून निवडणुका रखडल्याने माजी झालेल्या नगरसेवकांसह नव्याने नगरसेवक होवू इच्छिणाऱ्यांना प्रभाग रचना झाल्यानंतरच मोर्चेबांधणी करता येणार आहे. तूर्तास तरी इच्छुकांच्या आघाडीवर शांतता दिसत आहे. प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात येईल.
दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे. राज्यात मागील तीन चार वर्षात राजकीय समीकरणे बदलली आहे. शिवसेनेत तसेच राष्ट्रवादीत उभी फूट पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सामील झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. महानगरपालिका निवडणुकीतही विधानसभेप्रमाणेच महायुतीला यश मिळेल असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. मात्र महायुती आणि मविआतील पक्ष एकत्र लढतील की कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे स्वबळावर लढतील हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर्तास सगळेच वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.
अहिल्यानगरमध्ये विधानसभेला महायुतीकडून लढणारे आ.संग्राम जगताप यांनी हॅटट्रिक साधली. शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संघटन मोठे असून नगरसेवकांचे संख्याबळही अजितदादांच्या राष्ट्रवादीचेच अधिक आहे. दुसरीकडे भाजपही मनपा निवडणुक ताकदीने लढविण्याच्या तयारीत आहे. महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतले आहे. महायुतीतील तीनही पक्षात इच्छुक जास्त असल्याने तीनही पक्ष स्वबळ आजमावण्याचीच शक्यता आहे. दुसरीकडे शहरातील शिवसेना ठाकरे गटाची ताकद सध्या तरी कमी झाल्याचे दिसून येते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकत्र आल्याने शहरातील ठाकरे गट व मनसेत चैतन्य निर्माण झाले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करून ठाकरे गट निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना सुमारे 78 हजार मते मिळाली होती. त्यामुळे मविआ एकत्रित लढून मनपाचे गणिते साधण्याचा प्रयत्न करेल असेच चित्र आहे.


