शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार- मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी.
प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची पदोन्नती लवकरात लवकर करण्याबाबत शिक्षक संघटनेने आग्रही मागणी केली. 4 जुलै 2025 रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांचे विविध ज्वलंत प्रश्न मांडण्यात आले. त्याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागातील समाज जीवनाचा विचार करता अत्यंत अव्यवहार्य असलेली शनिवार सकाळ शाळेची वेळ पूर्ववत करण्यात आली. इतर जिल्हा परिषदप्रमाणे आपल्या जिल्ह्यातही उन्हाळ्यात वाढते तापमान व पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे सकाळ सत्रात शाळा भरविण्यात येत असतात. परंतु याचे वेळापत्रक यापूर्वी अनिश्चित असायचे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षण हक्क कायद्यातील सर्व तरतुदींचा सखोल विचार करून पूर्वनियोजन केल्याबद्दलही शिक्षक संघाच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
पदवीधर प्राथमिक शिक्षकांचा वेतनोत्तीचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षकांचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार असून जिल्हा परिषदेचा ‘माझी स्वच्छ, सुंदर आदर्श शाळा’ हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये प्रभावीपणे राबविला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यास संघटनेच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संघटना प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
यावेळी सर्वश्री संतोष दुसुंगे, अर्जुन शिरसाठ, नारायण पिसे, प्रकाश नांगरे, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, शिक्षक नेते भास्कर कराळे, संचालक कारभारी बाबर, बाळासाहेब कापसे, विश्वस्त संतोष आंबेकर, गहिनीनाथ पिंपळे, बजरंग गोडसे, संदीप ठाणगे, राजेंद्र ठोकळ, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण झावरे, नाना गाढवे, सचिन नाबगे, भाऊसाहेब ठाणगे, सुखदेव पालवे, प्रवीण थोरात बाळासाहेब जाधव आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
संघटना व प्रशासन यांच्यामधील सुसंवादाचा सेतू असेल तर जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असते. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षक प्रश्नांबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे संघटनेच्या वतीने स्वागत करतो.
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे.


