अहिल्यानगर – केडगाव परिसरातील माधवनगर येथे किरकोळ वादातून राग आल्याने सख्ख्या भावाने दुसऱ्या भावावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना ३१ जुलै रोजी मध्यरात्री १वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत प्रफुल्ल प्रमोद आल्हाट (वय ४१, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, माधवनगर, केडगाव) याने पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी याचे मध्यरात्री आई उषा आल्हाट यांच्यात घरगुती जेवणासंदर्भात बोलणे चालू असताना, राजेंद्र याने विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादी याने त्याला बोलण्यात हस्तक्षेप करु नकोस, असे सांगितले असता राजेंद्रने संतापून फिर्यादी यास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यानंतर घरातील पलंगाखाली लपवून ठेवलेला कोयता काढून त्याने फिर्यादी याच्या डोक्यात, मानेवर व डाव्या हातावर वार करुन जबर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रफुल्ल आल्हाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजेंद्र आल्हाट याच्या विरुद्ध बी एन एस ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार लगड हे करीत आहेत.


