अहिल्यानगर : शहराच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन चौकाजवळील धार्मिकस्थळी काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 24) पहाटे सुमारास घडली. जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात अॅड. वसीम रऊफ खान (वय 35, रा. आनंदीबाजार, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.काही समाजकंटक रविवारी पहाटे 2.45 ते 3.00 वाजताच्या सुमारास घटनास्थळी जेसीबी व दुचाकीवरून आले. त्यांनी धार्मिक स्थळाची तोडफोड करून जाणीवपुर्वक धार्मिक भावना दुखवून दंगल घडवून आणण्याचा व सामुदायिक सौहार्द बिघडवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला. हा प्रकार पहाटेच काही स्थानिकांच्या लक्षात आला. याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. घटना उजेडात आल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलीस अधीक्षक सोमनाथघार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी
फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
महापालिकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तोडफोड झालेल्या ठिकाणी दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेतले. घटनेची माहिती सकाळी शहरात वार्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


