पाकिस्तानी सौंदर्यप्रसादनांची अहिल्यानगरमध्ये विक्री
नकली सौंदर्यप्रसाधनांची विक्री रोखण्यासाठी कॉपीराईट कायद्यानुसार छापेमारी करताना अहिल्यानगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसादनांचीही विक्री होत असल्याचे आढळून आले. तीन दुकानांवर छापा घालून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आणि दुकानमालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. चेतन मोतीराम गणात्रा (रा. निगडी, पुणे) हे लिंकबस्टर ट्रेड मार्क अँड अँटी पायरसी कंपनीत इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. जय बाबा कॉस्मेटिक्सचे (मार्केट यार्ड) मालक केशव किशनचंद मोतीयानी (वय ६८, रा. सोनानगर), लक्ष्मी कॉस्मेटिक्सचे (मोची गल्ली) मालक प्रकाश वासुदेव सचदेव (वय ५०, रा. सावेडी) व कॉस्मेटिक्स अँड लेडीज शॉपीचे (मोची गल्ली) मालक विशाल पुरण साखला (वय ४४ रा. पारशाखुंट चौक) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे नकली मेहंदी, साबण व क्रीम अशी नकली उत्पादने आढळून आली आहेत. तसेच या कारवाईत पाकिस्तानात निर्मित उत्पादनेही जप्त करण्यात आली आहेत. एकूण ५८ हजार ५७१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघा दुकानमालकांवर कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश देशमुख व पोलीस पथकानेही ही कारवाई केली. ग्राहकांनी बाजारात सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करताना बारकाईने पहाणी करावी. संशयास्पद किंवा नकली माल आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
अहिल्यानगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसादनांची विक्री ; तीन दुकानांवर पोलिसांचा छापा
- Advertisement -


