मराठा उप समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंतरवाली सरायटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांचा सत्कार केला. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास दोघांमध्ये बंद दारावर चर्चा झाली.
दोघांची ही व्यक्तिगत भेट असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 2 सप्टेंबरच्या जीआरबाबत न्यायालयाने स्थगिती दिली नाही. तसेच उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे, असे म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही. त्यामुळे याची प्रक्रिया पुढे जाऊ द्या, असं आवाहन विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केलं आहे.
शरद पवार यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना मराठा समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्न आला नसता, असेही विखे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, आज सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप देखील विखे पाटील यांनी यावेळी केला. हैदराबाद गॅझिटिअरच्या जीआर संदर्भामध्ये प्रकरण न्यायालयात असताना, गावी दाखल करून मोर्चे काढणे योग्य नाही, असं देखील विखे पाटील ओबीसी नेत्यांना उद्देशून बोलले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी विखे पाटील यांना स्पष्ट सांगितलं आहे. मला जीआरनुसार प्रमाणपत्र पाहिजे. एक-दोन तास त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. विखेंमध्ये आम्हाला शंभर टक्के प्रामाणिकपणा दिसतो आहे. तो माणूस 100% गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे कल्याण करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. ज्या दिवशी वाटणार नाही, त्या दिवशी आपण सरकारच्या विरोधात जाणार. तुम्ही आरक्षण दिलं, तर आम्हाला काय घेणं पडलं राजकारणाचं. जो देईल तो आमचाच’.


