Sunday, December 7, 2025

उपजिल्हा रुग्णालयात १० डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे; आरोग्य सचिवांच्या भेटीपूर्वीच खळबळ

उपजिल्हा रुग्णालयात १० डॉक्टरांचे राजीनामे; आरोग्य सचिवांच्या भेटीपूर्वीच खळबळ

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर खंडपीठामुळे चर्चेत असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला (कुटीर रुग्णालय) मोठा धक्का बसला आहे. राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह यांनी रुग्णालयाला भेट देऊन येथील सुविधांची पाहणी करण्यापूर्वीच, रुग्णालयातील तब्बल १० डॉक्टरांनी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या अचानक झालेल्या सामूहिक राजीनाम्यांमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.​सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. एकीकडे वैद्यकीय अधिकारी, फिजिशिअन येथे येण्यास तयार नसताना, दुसरीकडे रुग्णालयात सुविधा उपलब्ध असूनही त्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. त्यातच, रुग्णालयाच्या समस्यांबाबत येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर याचिका दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत राज्य शासनाला खडे बोल सुनावल्यानंतर तज्ज्ञ समितीही नेमण्यात आली आहे.​याच पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव असलेले राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि समस्यांची माहिती घेतली. मात्र, आरोग्य सचिव रुग्णालयात असतानाच, रुग्णालयातील १० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले.​या सामूहिक राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, वैद्यकीय सेवेवर सतत येणाऱ्या प्रचंड ताणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

​या घटनेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी दुजोरा दिला आहे. राजीनामे दिले असले तरी हे अधिकारी अजून एक महिना रुग्णालयाच्या सेवेत असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

​कुटीर रुग्णालयाच्या समस्या आणि उच्च न्यायालयातील याचिकेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात १० डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने येथील आरोग्य सेवांवर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान आज शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आरोग्य सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक विरेंद्र सिंह भेट देऊन पाहणी करणार होते. मात्र त्यांनी काल शुक्रवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे होत्या. यावेळी त्यांनी विभागांची माहिती घेतली आणि पाहणी केली. मात्र पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. यावेळी नकुल पार्सेकर, रवी जाधव, संजू शिरोडकर, दिलीप भालेकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्या ऐकुन निघून गेले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles