Friday, February 20, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर ;शाळांच्या वेळेत बदल जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अहिल्यानगर-जिल्ह्यातील काही भागांत बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. पारनेर, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अकोले, अहिल्यानगर तालुक्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे बिबट्या प्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या वेळेत सकाळी 9.30 ते दुपारी 4 असा बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तसे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी शाळा व्यवस्थापन समिती, शाळा समितीची मंजूरी घेवून वेळेत बदल करावा, असे आदेशात नमूद केले आहे.जिल्ह्यामध्ये लहान मुलावरील बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना पारनेर, अहिल्यानगर तालुक्यांमध्ये घडल्या आहेत. शालेय विद्यार्थी यामध्ये जखमी व मयत झाले आहेत. दिवसेंदिवस बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थी पायी शाळेत येतात व शाळा सुटल्यावर पायी घरी जातात. रस्त्याच्या कडेने ऊस, जंगल, डोंगराळ असे बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र आहे. सध्या ऊसतोडीमुळे उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

तसेच सद्यस्थितीत हिवाळा ऋतूमुळे सायंकाळी लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना धोका पोहचू नये यासाठी शाळांच्या वेळेत सकाळी 9.30 ते दुपारी 4 असा बदल शाळा व्यवस्थापन समिती/शाळा समितीची मंजूरी घेवून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शाळास्तरावर सकाळच्या परिपाठात सुरक्षिततेबाबत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, शाळास्तरावर पालक मेळावे घेऊन शाळेत येताना व शाळा सुटताना पाल्यांना स्वतः घेऊन जाणेबाबत पालकांना कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची वर्गशिक्षकांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभा दरमहा घेवून विद्यार्थी सुरक्षेच्या अधिकच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या आहेत. गट शिक्षणाधिकारी यानी आपल्या तालुक्यातील किती शाळांच्या वेळेत बदल झाला याचा अहवाल तात्काळ शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना सादर करावा, असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles