लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना गैरफायदा घेतला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या महिलांवर आता कारवाई केली जाणार आहे.५ हजार सरकारी कर्मचारी, ३ हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात येत आहे. पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होणार असून त्या त्या विभागांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात येणार आहे.
या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी, शिक्षकांकडून पैसे वसूल केले जाणार असून त्यांची पगारवाढही रोखण्यात येणार आहे.
सुमारे पाच लाख महिला लाभार्थीनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही ‘लाडकी बहीण’चे पैसे लाटले आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.वयाच्या २१ वर्षांवरील आणि ६५ वर्षांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांना या योजनेतून वगळले जात आहे. दर महिन्याला अशा १० ते १२ हजार महिला या योजनेतून बाद होत आहेत यासाठी सॉफ्टवेअरमध्ये तशी रचनाच केली असून आपोआप वयाची पूर्तता झाल्यानंतर महिला यातून वगळले जात आहे.


