Friday, February 20, 2026

पारनेर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड

सुप्रिया शिंदे पारनेरच्या उपनगराध्यक्षा

बिनविरोध निवडीत महाविकास आघाडीचा ठसा

पारनेर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी सुप्रिया सुभाष शिंदे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. अपेक्षेप्रमाणे झालेल्या या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागाला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. सुप्रिया यांचे पती सुभाष शिंदे हे अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे काटेकोर निष्ठावंत सदस्य राहिले असून, त्यांच्या निष्ठेची दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी शिंदे परिवाराला या पदाची संधी देत त्यांचे योगदान अधोरेखित केले.

निवड प्रक्रियेत एकसंघतेचे प्रदर्शन

प्रांताधिकारी तथा पिठासिन अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते १ दरम्यान केवळ महाविकास आघाडीकडूनच सुप्रिया शिंदे यांचा अर्ज दाखल झाला. अर्जास सुचक म्हणून पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते तर अनुमोदक म्हणून माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत विरोधी गटाकडून अर्ज न आल्याने सुप्रिया शिंदे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गुलाल, फटाक्यांच्या आतषबाजीने उत्साहात सामील झाले.

खा. लंके यांच्याकडून अभिनंदन

निवडीनंतर खासदार नीलेश लंके यांनी भ्रमणध्वनीवरून सुप्रिया शिंदे यांचे थेट अभिनंदन केले. “महाविकास आघाडीने या निवडणुकीतही एकसंघतेची परंपरा कायम ठेवली,” असे समाधान त्यांनी व्यक्त केले. तसेच खा. लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी शिंदे यांचा नगरपंचायत कार्यालयात सत्कार केला.

त्याग, निष्ठा आणि पक्षाप्रती प्रामाणिकता

“शिंदे परिवाराची निष्ठा अभंग आहे. पहिल्या निवडणुकीत उमेदवारी कापली गेली तरी नाराजी न व्यक्त करता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे उदाहरण त्यांनी घालून दिले.”
पाच वर्षांपूर्वी उमेदवारी न मिळाल्यानंतरही सुभाष शिंदे पक्षासोबत उभे राहिले. नंतर झालेल्या निवडणुकीत सुप्रिया शिंदे नगरसेविका म्हणून निवडल्या गेल्या.नगराध्यक्षपदाच्या पहिल्या निवडीवेळी सुप्रिया अतिदक्षता विभागात उपचार घेत होत्या, तरीही त्या व्हीलचेअरवरून येत सभेला उपस्थित राहिल्या हा प्रसंग आजही कार्यकर्त्यांच्या स्मरणात ताजा आहे.“त्याच दिवसापासून सुप्रिया यांना उपनगराध्यक्षपद देण्याचा शब्द खासदार लंके यांनी दिला होता आणि तो त्यांनी आज पूर्ण केला.”

अर्जुन भालेकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष

‘ही संधी कृतज्ञतेची आणि जबाबदारीची’

निवडीनंतर बोलताना सुप्रिया शिंदे म्हणाल्या,
“एका छोट्याशा वाडीतून आलेल्या मला उपनगराध्यक्षपदाची संधी देऊन खा. नीलेश लंके यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. नगराध्यक्षा, सभापती आणि नगरसेवक यांच्यासह समन्वय साधून या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन.”
महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता एकजुटीने निवड प्रक्रियेत सहभागी झाले, याचे श्रेयही त्यांनी खा. लंके यांच्या नेतृत्वाला दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles